Stock Market Crash : भारतीय शेअर बाजारात आज मोठी घसरण पाहायला मिळाली, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर (BSE) सेन्सेक्स जवळपास 1000 अंकांनी कोसळला तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर (NSE) निफ्टी 300 अंकांनी घसरली. या घसरणीचं मुख्य कारण अमेरिकेच्या मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हनं 2025 मध्ये व्याजदर कपातीच्या अंदाजात बदल केल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे केवळ भारतीय बाजारच नाही, तर जागतिक स्तरावरही बाजारपेठांमध्ये अस्थिरता पाहायला मिळत आहे.
भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्सने 80,000 च्या महत्त्वपूर्ण पातळीखाली घसरत 79,237 अंकांवर व्यापार केला. निफ्टीही 90 अंकांनी घसरून 23,907 अंकांवर स्थिरावली. बाजारात अशा प्रकारे घसरण झाल्याने गुंतवणूकदारांच्या मनात भीती निर्माण झाली असून मोठ्या प्रमाणात विक्रीचा प्रभाव दिसत आहे.
सेन्सेक्समधील 30 कंपन्यांपैकी 28 कंपन्यांचे शेअर्स घसरले, तर फक्त दोन कंपन्यांच्या शेअर्समध्ये किरकोळ तेजी दिसली. निफ्टीवरही अशीच परिस्थिती होती, जिथे 50 पैकी केवळ तीन कंपन्यांचे शेअर्स तेजीत राहिले, तर उर्वरित 47 कंपन्यांचे शेअर्स घसरले. या घसरणीत प्रमुख आयटी कंपन्या आणि बँकिंग क्षेत्रातील शेअर्स मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाले. इन्फोसिस, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), HCL टेक, टेक महिंद्रा, आणि टाटा स्टील यांसारख्या दिग्गज कंपन्यांच्या शेअर्समध्ये 2% पर्यंत घसरण झाली. याउलट, हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL) आणि ITC या दोन कंपन्यांचे शेअर्स तेजीत राहिले.
बीएसईवरील एकूण 3306 कंपन्यांपैकी फक्त 841 कंपन्यांचे शेअर्स तेजीत राहिले, तर 2354 कंपन्यांचे शेअर्स घसरले. या घसरणीचा परिणाम असा झाला की, बाजारात सकाळच्या सत्रातच गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटी रुपये बुडाले. बीएसईचं मार्केट कॅप 452.6 लाख कोटी रुपयांवरून 449.34 लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आलं.
बँकिंग, ऑटोमोबाईल, आयटी, एफएमसीजी, मेटल्स, एनर्जी, आणि ऑइल अँड गॅस क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. मात्र, फार्मा आणि हेल्थकेअर कंपन्यांचे शेअर्स बाजारातील या अस्थिरतेमध्येही तेजीत राहिले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही मोठ्या प्रमाणावर घसरण झाली असून लहान गुंतवणूकदारांनाही याचा फटका बसला आहे.
या घसरणीचं प्रमुख कारण म्हणजे अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हच्या घोषणेमुळे जागतिक स्तरावर निर्माण झालेली नकारात्मक भावना. फेडरल रिझर्व्हने 2025 मध्ये व्याजदर कपात होण्याबाबत अपेक्षांमध्ये घट केल्याने अमेरिकन शेअर बाजारातही घसरण झाली. डाऊ जोन्स, नॅस्डॅक, आणि S&P 500 यांसारख्या प्रमुख निर्देशांकांमध्येही मोठी घसरण झाली आहे. याचा थेट परिणाम भारतीय बाजारावर दिसून आला.
डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाच्या किमतीतही घसरण झाली असून सध्या एका डॉलरसाठी 85 रुपये मोजावे लागत आहेत. रुपयाच्या कमकुवतपणामुळेही भारतीय बाजारपेठांवर नकारात्मक प्रभाव पडत आहे. आयातीवरील खर्च वाढल्याने आर्थिक दबाव वाढत आहे.
गेल्या तीन दिवसांपासून भारतीय शेअर बाजार सातत्याने घसरत आहे. या काळात गुंतवणूकदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. जागतिक बाजारात अनिश्चितता वाढल्याने भारतीय बाजारावरही दबाव आहे. शेअर बाजारातील घडामोडींमुळे गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता आहे. अनेक गुंतवणूकदारांनी विक्रीला प्राधान्य दिलं आहे, ज्यामुळे बाजार आणखी खाली सरकतोय.
शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी सध्याची परिस्थिती कठीण आहे. तज्ज्ञांच्या मते, अशा परिस्थितीत संयम बाळगणं महत्त्वाचं आहे. बाजारात झालेली घसरण ही तात्पुरती असते आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी अशा घसरणीचा फायदा घेतला जाऊ शकतो. त्यामुळे गुंतवणूकदारांनी घाईगडबडीत निर्णय घेण्याऐवजी सल्लागारांकडून योग्य मार्गदर्शन घ्यावं.