Omraje nimbalkar : धाराशिव निवडणुकीत नवा ट्विस्ट ! ओमराजेंच्या घरातच उठले बंडाचे वारे, मकरंद राजे अपक्ष मैदानात

By janshahi24news

Published on:

Follow Us
---Advertisement---

Omraje nimbalkar : धाराशिव जिल्ह्यातील निवडणुकीच्या रणधुमाळीत एका अनपेक्षित वळणाची भर पडली आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या भावाने, मकरंद राजे निंबाळकर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज घेतला आहे, ज्यामुळे धाराशिव कळंब मतदारसंघात एक वेगळीच रंगत येणार आहे. मकरंद राजे हे शिवसेनेचे धाराशिव जिल्ह्यातील सह संपर्कप्रमुख असून, त्यांनी यापूर्वी ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारात सक्रिय भूमिका निभावली आहे. त्यांच्या या पावलामुळे आता उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारांपुढे एक नवी आव्हानं उभी राहिली आहेत.

मकरंद राजे धाराशिव-कळंब मतदारसंघातून शिवसेना तिकीट मिळवण्याच्या इच्छेत होते, परंतु महाविकास आघाडीच्या तिकिटवाटपात हा मतदारसंघ उद्धव गटाला सोडण्यात आला असून विद्यमान आमदार कैलास पाटील यांना तिकिट मिळाले आहे. यापूर्वी मकरंद राजे धाराशिव कळंबऐवजी तुळजापूर मतदारसंघातूनही इच्छुक होते, परंतु येथेही काँग्रेस पक्षाला तिकीट देण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या इच्छेला तडे गेले. शेवटी त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, जो उद्या अर्ज दाखल करून अधिकृत होईल.

मकरंद राजे निंबाळकर यांचा राजकीय प्रवास

धाराशिव जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मकरंद राजे निंबाळकर हे महत्त्वाचे स्थान भूषवत आले आहेत. धाराशिव नगरपालिकेत सलग १५ वर्षे सदस्य राहिल्यानंतर, त्यांनी सात वर्षे नगराध्यक्षपदाची धुरा सांभाळली. त्यांच्या कार्यकाळात धाराशिव शहराच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवले गेले. या योगदानामुळे त्यांच्याभोवती निष्ठावंत कार्यकर्त्यांचा मोठा गट तयार झाला आहे. त्यांचा जनसंपर्क केवळ धाराशिव शहरापुरता मर्यादित नसून कळंब व धाराशिव तालुक्यातही प्रभावी आहे.

कार्यकर्त्यांचा पाठिंबा आणि अपक्ष उमेदवारीचा निर्णय

त्यांच्या कार्यकर्त्यांनी तिकीट न मिळाल्यानंतरही त्यांना निवडणूक लढण्याचा आग्रह धरला. कार्यकर्त्यांच्या या पाठिंब्यामुळे मकरंद राजे अपक्ष उमेदवारीच्या विचाराकडे वळले, आणि अखेर त्यांनी उमेदवारी अर्ज उचलला. उद्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ते उमेदवारी अर्ज दाखल करतील. त्यांच्या कार्यकर्त्यांनी मकरंद राजेंना आश्वासन दिले आहे की, हे पाऊल त्यांना अधिक लोकाभिमुख नेता बनवेल.

मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाचा पाठिंबा?

सध्या राज्यात मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांचे नाव घेतले जात आहे. जरांगे पाटील यांनी जर मकरंद राजेंना अधिकृत समर्थन दिल्यास, हे निवडणूक चित्र आणखी चुरसदार बनू शकते. अशा परिस्थितीत मकरंद राजेंना मराठा समाजाचा समर्थन मिळू शकते आणि त्यांचे स्थान अधिक बळकट होण्याची शक्यता आहे.

आता पाहावे लागेल की, विद्यमान आमदार कैलासपाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर मकरंद राजेंची नाराजी कशी दूर करणार, धाराशिव-कळंब मतदारसंघातील ही निवडणूक एकाच पक्षातील दोन गटांमध्ये चुरस निर्माण करत असल्याने, येत्या काळात या प्रकरणाला कोणते वळण मिळते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

" target="_blank" rel="nofollow noreferrer noopener">