Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्याची प्रतीक्षा आता संपली आहे. राज्यभरातील महिलांना या योजनेच्या सहाव्या हप्त्याचा लाभ मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली होती. या घोषणेनंतर महिलांमध्ये आनंदाची लाट पसरली असून, त्यांच्या खात्यात 1500 रुपयांची रक्कम वर्ग होण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे.
महिलांच्या खात्यात रक्कम वर्ग होणार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत याआधी पाच हप्त्यांमध्ये 7500 रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. डिसेंबर महिन्याचा हप्ता हा सहावा आहे, ज्यासाठी सरकारने 3500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. जुलैपासून सुरु झालेल्या या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावर प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांचा हप्ता जमा केला जातो. विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याची रक्कमही जमा करण्यात आली होती.
डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रक्रिया आजपासून सुरू होत असल्याने महिलांना यावर्षीच 1500 रुपयांचा सहावा हप्ता मिळणार आहे. हा हप्ता दोन टप्प्यांमध्ये दिला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात, जवळपास 2 कोटी 35 लाख पात्र महिलांच्या खात्यात रक्कम जमा केली जाईल. उर्वरित अर्जांची स्क्रुटिनी पूर्ण झाल्यानंतर, दुसऱ्या टप्प्यात उर्वरित महिलांना देखील लाभ दिला जाईल.
योजनेत 2100 रुपयांची वाढ कधी होणार?
महायुती सरकारने योजनेची घोषणा करताना हप्त्याची रक्कम 1500 वरून 2100 रुपयांपर्यंत वाढवण्याचे आश्वासन दिले होते. महिलांना या वाढीच्या रक्कमेबाबत मोठ्या अपेक्षा असून, त्या रक्कम कधीपासून लागू होईल याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, यंदाचा डिसेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपयांच्या प्रमाणेच दिला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की, या निर्णयासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल. त्यामुळे 2100 रुपयांचा हप्ता मिळण्यासाठी महिलांना थोडी प्रतीक्षा करावी लागेल.
महिला व बाल कल्याण विभागाची भूमिका
योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी महिला व बाल कल्याण विभाग महत्त्वाची भूमिका बजावत आहे. विभागाकडे आलेल्या 25 लाख नव्या अर्जांची पडताळणी अजून सुरू असून, त्यानंतर या लाभार्थींना देखील योजनेचा हप्ता दिला जाईल. पात्रता निश्चित करण्यासाठी केलेल्या या प्रक्रियेमुळे योजनेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता वाढली आहे.
महिलांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम
माझी लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील महिलांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होत आहेत. महिलांना आर्थिक पाठबळ मिळाल्याने त्या आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या अधिक सक्षमपणे पार पाडत आहेत. शिवाय, या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळण्यास मदत होत आहे.