संगमनेरमधील वादग्रस्त घटनेत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये दोन वेगवेगळे गुन्हे समाविष्ट आहेत, ज्यात विखे समर्थकांना जीवे मारण्याचा प्रयत्न आणि वाहनांचे नुकसान करणे यांचा समावेश आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात बीएनएस कलम 109 सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणात जयश्री थोरात यांच्यासह 50 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ज्यात बाळासाहेब थोरातांच्या बंधुंसह त्यांच्या निकटवर्ती कार्यकर्त्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, आचारसंहितेच्या काळात आंदोलकांवरही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आंदोलकांनी आचारसंहितेचा भंग करून जमाव बंदी आदेशाचा उल्लंघन केला, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगमनेरमधील महिला नेत्याबद्दल भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांच्या संकल्प सभेत भाजपचे वसंतराव देशमुख यांनी केलेले वादग्रस्त वक्तव्य राज्यभरात चर्चेचा विषय बनले आहे. देशमुख यांच्या वक्तव्यामुळे थोरातांचे समर्थक आक्रमक झाले आणि त्यांनी विखे यांच्या गाड्यांची तोडफोड केली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर, जयश्री थोरात यांनी पोलिस स्टेशनच्या बाहेर ठिय्या आंदोलन केले, ज्यामध्ये वसंतराव देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी केली गेली.
जयश्री थोरात यांचा आक्रमक प्रतिसादगुन्हा दाखल झाल्यानंतर जयश्री थोरात आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी संगमनेर शहर पोलिस ठाण्यावर महिलांसह मोर्चा काढला. त्यांनी आरोप केला की, राजकीय दबावाचा वापर करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. “सर्व सामान्य महिलांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आले आहे. मी घाबरत नाही. पोलिसांनी मला अगोदर अटक करावी,” असे जयश्री थोरात यांनी म्हटले आहे.
वसंतराव देशमुख यांचं वादग्रस्त वक्तव्य
भाऊसाहेब थोरात यांची नात… ती तर बोलती म्हणत्यात… माझा बाप सगळ्याचा बाप… काही कळत नाही. तुला सुद्धा पोरं कशी झाली? हा प्रश्न आहे. आपल्या कन्येला समजवा. नाहीतर आम्ही जर निवडणूक काळात मैदानात उतरलो तर तुमची मुलगी घराबाहेर पडू शकणार नाही, सुजयदादा तिला प्रेमाने ताई म्हणतात. बरोबर आहे, त्यांची संस्कृती आहे ती. पण दादा, या ताईचे पराक्रम जर पाहिले ना… सगळ्या तालुक्याला माहिती आहेत, असं वसंतराव देशमुख म्हणालेत.