राज्यातील विधानसभा निवडणुकांना अवघे काही आठवडे राहिले आहेत, आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) या निवडणुकीच्या तयारीत सक्रियपणे उतरत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वबळावर विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता त्यांनी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे.यादीत पुण्यातील तीन महत्त्वाच्या मतदारसंघांमधील उमेदवारांची नावे समाविष्ट आहेत. विशेषतः खडकवासला मतदारसंघातून दिवंगत माजी आमदार रमेश वांजळे यांचे पुत्र मयुरेश वांजळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निर्णयाबद्दल मयुरेश वांजळे यांनी राज ठाकरे यांचे आभार मानले आणि त्यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही, असे स्पष्ट केले.मनसेने काल रात्री उशिरा ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली असून आतापर्यंत ४७ उमेदवारांची घोषणा झाली आहे. पुण्यातील कोथरुडमधून किशोर शिंदे, हडपसरमधून साईनाथ बाबर आणि खडकवासला मतदारसंघातून मयुरेश वांजळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
मयुरेश वांजळे यांनी टीव्ही 9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले, “मी राज ठाकरे यांचे आभार मानतो, जेव्हा त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. खडकवासल्याच्या सिंहगडावर शिवमुद्रा नक्कीच फडकणार आहे.” त्याने आपल्या बहिणीबद्दलही बोलताना सांगितले की, “ती अजित पवार गटात असली तरी मला पाठिंबा देईल.”महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) खडकवासला मतदारसंघाचे उमेदवार मयुरेश वांजळे यांची बहीण ही अजित पवार गटात आहे. आणि रमेश वांजळे मनसे मध्ये आहेत आता त्यांची बहिण त्यांना पाठिंबा देते का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
रमेश वांजळे कोण?
रमेश वांजळे हे मनसेचे आक्रमक नेते आणि आमदार म्हणून ओळखले जातात. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेच्या तिकीटावर खडकवासला मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला होता, त्यांचा हा विजय काँग्रेसमधून मनसेत दाखल झाल्यानंतर साधला होता. त्यांचे व्यक्तिमत्त्व, विशेषतः सोन्याचे दागिने घालण्याची हौस, त्यांना “गोल्ड मॅन” म्हणून ओळखण्यास कारणीभूत ठरले.तथापि, 10 जून 2011 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने रमेश वांजळे यांचे निधन झाले, त्यांच्या आकस्मित निधनामुळे मनसेने पुण्यातील एक सक्षम आमदार गमावला. आता, 13 वर्षांच्या ब्रेकनंतर, मयुरेश वांजळे यांना खडकवासला मतदारसंघातून उमेदवारी देऊन त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे. त्यामुळे आता खडकवासल्याचे मतदार त्यांच्या दिवंगत नेत्याप्रमाणे त्याच्या मुलाला किती पाठिंबा देतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.राज्यातील या निवडणुकीत मनसेचा हा उमेदवार कोणता प्रभाव निर्माण करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.