Dhule Election EVM Scam : निवडणुकीत ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप; निवडणूक आयोगाकडे तक्रारीचा इशारा

By janshahi24news

Published on:

Follow Us
Dhule Election EVM Scam
---Advertisement---

Dhule Election EVM Scam : धुळे जिल्ह्यातील शिरपूर विधानसभा मतदारसंघाच्या निकालावर वादंग पेटले आहे. भाजपच्या विजयावर शंका उपस्थित करत, उमेदवार गितांजली कोळी यांनी भाजपवर ईव्हीएम प्रणालीतील घोटाळ्याचा गंभीर आरोप केला आहे. धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या भवनात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हा मुद्दा मांडला आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला.

Dhule Election EVM Scam

गितांजली कोळी म्हणाल्या की, गावागावातून मला अनेक फोन आले. लोक विचारत होते, ‘तुम्हाला मतदान का पडले नाही?’ मी मतदारांशी संवाद साधत होते आणि त्यांच्या प्रश्नांवर मी थक्क झाले. निवडणुकीत जास्तीत जास्त पन्नास हजार किंवा कमीत कमी तीस हजार मते मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र, निकाल काही वेगळाच सांगतो.

Dhule Election EVM Scam

त्यांनी यावेळी भाजपच्या उमेदवारांवर अप्रत्यक्ष निशाणा साधत म्हटलं की, ज्या उमेदवारांनी प्रचारासाठी गावोगावी फिरणे टाळले, त्यांनाही पाच हजारांपेक्षा जास्त मते मिळाली. यावरून स्पष्ट होते की, मतमोजणी प्रक्रियेत किंवा ईव्हीएम प्रणालीत गडबड झाली आहे. आदिवासी टोकरे कोळी जमातीला धुळे जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी हे फार मोठं षडयंत्र आहे.

Dhule Election EVM Scam

गितांजली कोळी यांनी शिरपूरातील शेतकऱ्यांच्या अडचणींवरही भाष्य केले. “शेतकरी मोठ्या संकटात आहेत. पाणीटंचाई, कर्जबाजारीपणा आणि योजनांचा अपुरा लाभ यामुळे त्यांचा उद्रेक होत आहे. शिवाय, महिलांना अजूनही ‘लाडकी बहिण योजना’ यासारख्या योजनांचा लाभ मिळालेला नाही. मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे,” असं त्या म्हणाल्या.

गितांजली कोळी यांनी आदिवासी समाजाच्या नाराजीवरही भाष्य केलं. त्या म्हणाल्या, शिरपूर हा राखीव मतदारसंघ आहे. इथल्या आदिवासी समाजाच्या समस्या गंभीर आहेत. पण त्या ऐकण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. आमदार पावरा यांची लोकप्रियता घसरत चालली असतानाही त्यांचा विजय झाला, हे मान्य होणं कठीण आहे. आदिवासी समाजाचा आवाज दडपण्याचा प्रयत्न भाजप करत आहे.

ईव्हीएममधील घोटाळ्याच्या आरोपावर त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्याचा इशाराही दिला आहे. “मी शिरपूरच्या सहा उमेदवारांपैकी सर्वाधिक प्रचार केला. साठ ते सत्तर गावांत फिरले. लोकांशी थेट संवाद साधला. तरीही निकाल वेगळेच सांगत आहेत. यामागचं सत्य उघड करण्यासाठी मी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करणार आहे,” असं त्यांनी सांगितलं.

या पत्रकार परिषदेला रवींद्र कोळी, गिरधर महाले आणि हेमराज कोळी यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. गितांजली कोळी यांनी पुढील निवडणुकीसाठी संघर्षाची तयारी केली असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी मतदारांचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी अधिक मेहनत घेण्याचा निर्धार व्यक्त केला.

Leave a Comment

" target="_blank" rel="nofollow noreferrer noopener">