कुलाबा विधानसभा मतदारसंघात भाजपने पुन्हा एकदा अॅड. राहुल नार्वेकर यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना उमेदवारी दिली आहे. याआधी भाजपचे राज पुरोहित या मतदारसंघाचे आमदार होते, आणि त्यांची उमेदवारी वगळल्यामुळे ते काहीसे नाराज असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, भाजपने या नाराजीचा तोडगा काढण्यात यश मिळवलं आहे. राजकीय वर्तुळात आता चर्चा आहे की, आगामी निवडणुकीत राहुल नार्वेकर यांच्यासमोर कोणते आव्हान उभं राहणार, आणि ते या मतदारसंघात आपला विजय कायम ठेवणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
कुलाबा विधानसभा मतदारसंघ, जो मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे, मुंबईतील महत्त्वाचा राजकीय गड मानला जातो. २००८ मध्ये नव्या मतदारसंघांच्या रचनेनंतर त्याची निर्मिती करण्यात आली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे अॅड. राहुल नार्वेकर यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला होता, त्यांनी काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांचा पराभव केला. त्याआधी भाजपचे राज पुरोहित या मतदारसंघाचे आमदार होते.यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिल्याने काहीशी नाराजी व्यक्त होत होती, कारण राज पुरोहित यांची दावेदारी बाजूला ठेवण्यात आली होती. ही नाराजी दूर करण्यासाठी राज पुरोहित यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, आणि फडणवीसांनी त्यांची नाराजी कमी केली. त्यामुळे भाजपने मुंबईतील पहिली संभाव्य बंडखोरी रोखण्यात यश मिळवलं आहे.
दोन्ही नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली, ज्यात त्यांनी संभ्रम दूर केला. राहुल नार्वेकर म्हणाले, “ही निवडणूक राज पुरोहित आणि माझी एकत्रित लढाई आहे. आम्ही एकत्र येऊन ५०,००० मतांच्या फरकाने विजय मिळवू, भाजपाच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. अशी घोषणा विधानसभा अध्यक्ष भाजप नेते राहुल नार्वेकर यांनी पत्रकार परिषद घेत केलेली आहे. या पत्रकार परिषदेला माजी आमदार राज पुरोहित हे देखील उपस्थित होते.
“कुलाबा विधानसभा मतदारसंघात राज पुरोहित यांचा पूर्वीपासूनच प्रभाव राहिला आहे. २००९ मध्ये ते येथे पराभूत झाले होते, परंतु २०१४ मध्ये विजय मिळवत विधानसभेवर पोहोचले. २०१९ मध्ये मात्र भाजपने राज पुरोहित यांना बाजूला ठेवून राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिली, आणि त्यांनी विजय मिळवला. आता २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतही विद्यमान आमदार अॅड. राहुल नार्वेकर यांना पुन्हा संधी मिळाली आहे.