Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतील पानसरेवाडी येथे झालेल्या सभेत थेट लोकांशी संवाद साधत विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी आपले मत स्पष्ट केले. या वेळी त्यांनी लोकसभेत बारामतीकरांनी केलेल्या मतदानावर भाष्य केले आणि विधानसभेसाठी सावधगिरीचा इशारा दिला.
लोकसभा निवडणुकीचा उल्लेख
अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत तुम्ही साहेबांवर विश्वास ठेवून सुप्रिया ताईंना मतदान केलं. मी त्यावेळी काहीही म्हटलं नाही कारण तो तुमचा अधिकार होता. मात्र, विधानसभेसाठी तुम्हाला थोडं भान ठेवावं लागेल. आपण अजून बरीच कामं बाकी ठेवली आहेत, ती पूर्ण करण्यासाठी महायुतीचं सरकार पुन्हा आणायचं आहे.”
गंमत करू नका, नाहीतर…
पवार यांनी लोकसभा निवडणुकीतील मतदानाच्या निर्णयावर एक हलकासा टोमणा मारत विधानसभेतील मतदानाचा गंभीर संदेश दिला. “लोकसभेला तुम्ही थोडी गंमत केली, ती मी मान्य केली. पण आता विधानसभेला अशी गंमत करू नका. नाहीतर त्याचे गंभीर परिणाम तुम्हालाच भोगावे लागतील. बारामतीकरांना वाली राहणार नाही,” असे ते ठामपणे म्हणाले.
अजित पवारांनी खासदार शरद पवार (Ajit Pawar) यांच्या निवृत्तीचा उल्लेख करत म्हटले, “साहेबांनी स्वतः सांगितलं आहे की दीड वर्षांनी ते निवडणुकीसाठी उभे राहणार नाहीत आणि पुन्हा खासदारही होणार नाहीत. त्यानंतर कोण बघणार आहे, हा विचार करा. कोणात दम आहे, कोण शब्द पाळतो, याचा बारामतीकरांनी विचार करायला हवा.”
भावनिक राजकारणाला विरोध
पवार यांनी बारामतीतील राजकारणातील भावनिकतेवरही भाष्य केले. “भावनिक राजकारणाला बळी पडू नका. कोणाकडे कामाची ताकद आहे, बारामतीला पुढे नेण्याची इच्छा आहे, याचा नीट विचार करा,” असे त्यांनी सुचवले.
जमलेल्या जनतेसाठी आग्रहाची विनंती
आपल्या खास शैलीत अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “यावेळी चांगल्या पद्धतीने मतदान करा. माझी सर्व वडीलधारी मंडळी आणि मायमाऊलींना विनंती आहे. तुम्ही नेहमीच मला साथ दिली आहे. घड्याळालाच मतदान केलं आहे. तरुणांनो, मला पुन्हा साथ द्या. मी तुमच्यासाठी अजूनही नवनवीन संधी निर्माण करू शकतो.”
बारामतीतील राजकीय परिस्थितीवर भाष्य करत पवार म्हणाले, “बारामतीत कधीच असे वेगळे प्रकार घडले नव्हते. मात्र, लोकसभेच्या निवडणुकीत वेगळे चित्र दिसले. आता विधानसभेत आपल्याला विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल.”
पवार यांनी बारामतीच्या विकासासाठी महायुतीच्या सरकारचे महत्त्व स्पष्ट केले. “पुढील कामं होण्यासाठी चांगल्या निर्णयांची गरज आहे. यावेळी कोणताही चुकीचा निर्णय होऊ नये,” असे आवाहन त्यांनी केले.
पानसरेवाडीतील लोकांना थेट संवाद साधत अजित पवार म्हणाले, “माझी लोकांशी असलेली जवळीक आणि तुमचं मोलाचं पाठबळच माझं खरं बलस्थान आहे. या वेळी चुकीचा निर्णय होऊ देऊ नका. बारामतीला पुढे नेण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घ्या.”
अजित पवारांच्या या स्पष्टवक्तेपणाने आणि थेट संवादाने बारामतीतील जनतेपर्यंत एक प्रभावी संदेश पोहोचला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या भाषणाने राजकीय चर्चा वाढवली आहे.