वरळी विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाचा मास्टरस्ट्रोकः मिलिंद देवरा आदित्य ठाकरेंच्या विरोधात ?

By janshahi24news

Published on:

Follow Us
---Advertisement---

Aditya Thakre warli vidhansabha consultancy : राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु आहे, आणि वरळी मतदारसंघात लक्षवेधी राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसेना (ठाकरे गट) तर्फे आदित्य ठाकरे पुन्हा एकदा या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरतील, असे दिसत आहे. 2019 मध्ये त्यांनी याच मतदारसंघातून पहिल्यांदा आमदारकी जिंकली होती. मात्र, या वेळी त्यांच्यासमोर तगडं आव्हान उभं राहिल्याचं जाणवत आहे कारण त्यांच्या विरोधात मिलिंद देवरा यांचे नाव चर्चेत आहे.

मिलिंद देवरा यांनी शिवसेना शिंदे गटात काही महिन्यांपूर्वीच प्रवेश केला, आणि सध्या ते राज्यसभेचे खासदार आहेत. महायुतीमधून शिवसेना शिंदे गटाला वरळी मतदारसंघ देण्यात आला असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मतदारसंघातून देवरा यांना मैदानात उतरवण्याची तयारी केली आहे. शिवसेनेच्या विभाजनानंतर आदित्य ठाकरे यांनी अनेकदा मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या गटावर तिखट टीका केली आहे.त्यांनी शिंदे यांना वरळीमधून निवडणूक लढवण्याचे खुले आव्हानही दिले होते. त्यामुळे आता देवरा यांच्या उमेदवारीमुळे ठाकरे आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष आणखीन तीव्र होईल, अशी चर्चा आहे.

मिलिंद देवरा यांच्या राजकीय प्रवासाकडे पाहिल्यास, ते माजी काँग्रेस नेते मुरली देवरा यांचे सुपुत्र आहेत. त्यांनी 2004 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीत प्रवेश केला आणि सलग दोनदा, 2004 आणि 2009 मध्ये विजयी झाले. काँग्रेसच्या काळात ते राज्यमंत्री होते, पण नंतर त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आणि त्यांना राज्यसभेचे खासदारपद देण्यात आले.

वरळी मतदारसंघ हा त्यांच्या जुन्या लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. 2009, 2014 आणि 2019 च्या निवडणुकांमध्ये त्यांनी या मतदारसंघातून चांगली मते मिळवली होती. विशेषतः 2009 मध्ये त्यांना 39 हजार मते मिळाली, तर 2014 मध्ये 35 हजार आणि 2019 मध्ये 41 हजार मते मिळाली होती. मात्र, या निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराने त्यांना दुप्पट मताधिक्याने मागे टाकले होते.

आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघातून 2019 मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते. आणि त्यांना 2019 मध्ये महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री पद देखील देण्यात आलं होतं. सध्याच्या राजकीय परिस्थितीत आदित्य ठाकरे आणि मिलिंद देवरा हे दोघेही तुल्यबळ उमेदवार वाटत असल्याने, वरळीची निवडणूक अत्यंत रोचक होणार आहे. कोण बाजी मारणार, हा एकच प्रश्न मतदारांच्या मनात घर करत आहे, आणि यामुळे या निवडणुकीची उत्कंठा अधिकच वाढली आहे.

Leave a Comment

" target="_blank" rel="nofollow noreferrer noopener">